मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत क्रांतिवीर शाळेचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक |
म्हसवड दि. २९
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 मध्ये खाजगी व्यवस्थापन प्रवर्गातून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड यांनी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून आपला सर्वोत्कृष्ट दर्जा अधोरेखित केला आहे.
जिल्हास्तरीय तपासणी पथकाने एक महिन्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील विविध 11 तालुक्यातून प्रथम आलेल्या या प्रवर्गातील 11 शाळांची तपासणी केली होती. जिल्ह्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल शाळेला सात लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे, मात्र तीन मार्कासाठी प्रथम क्रमांक गेल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तपासणी पथकात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सातारा चे प्राचार्य अमोल डोंबाळे, जिल्हा परिषद सातारा उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आदी अधिकारी मान्यवरांचा समावेश होता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने माण तालुक्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी उच्चाधिकारी टीमने तपासणी केली होती.
शाळेतील भौतिक सुविधा, आय सी टी लॅब, क्रीडा विभागातील सहभाग, कौशल्य युक्त शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास , शाळा सुधारणा साठी निधी मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न, स्वच्छता मॉनिटर उपक्रम सहभाग, परसबाग, रेन हार्वेस्टिंग, सोलर व्यवस्था, बोलक्या भिंती, नव साक्षरता,,अध्ययन निश्चिती, विद्यांजली पोर्टल, प्रयोगशाळा, शिक्षकांची शैक्षणिक अहर्ता इत्यादी मुद्द्याला अनुसरून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने उल्लेखनीय प्रगतीचे कार्य केले असून यामध्ये शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, शाळेतील सर्व शिक्षक, यांनी या कामी विशेष परिश्रम घेतले. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर, उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, जिल्हा वेतन पथकाचे प्रमुख हेमंत खाडे, माण गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख दीपक कुमार पतंगे पालक शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले.०००
About The Author

Comment List