सावळजच्या 'स्मार्ट पीएचसीला' गळती !
निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी, अनेक समस्या मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
On
तासगांव, राजदंड न्यूज नेटवर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा आणि सुविधांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रांचा स्मार्ट पीएचसीमधून विकास केला आहे. मात्र लोकार्पण सोहळ्याच्या अगोदरच स्मार्ट पीएचसीच्या नवीन इमारतीला मोठी गळती लागली आहे. पावसामध्ये मीटिंग हालमध्ये गळतीचे पाणी मोठ्या प्रमाणात साचुन राहत आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपचारांसाठी आधार आहे. म्हणून तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्मार्ट पीएचसी ही योजना राबविली होती. या योजनेसाठी जिल्ह्यातील ६४ आरोग्य केंद्रापैकी ४७ आरोग्य केंद्राची निवड केली होती. त्यापैकी सावळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्मार्ट पीएचसीत समावेश आहे.
येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या केंद्रात स्मार्ट पीएचसीची निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहेत. या केंद्रात नव्याने बांधण्यात आलेल्या मीटिंग हाॅलला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पावसामुळे हाॅलमध्ये गळतीचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वारंवार कर्मचाऱ्यांना पाणी बाहेर काढावे लागत आहे. त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्यातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या स्मार्ट पीएचसीच्या बांधकामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातुन जोर धरू लागली आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, आरोग्य सेवेचा बोजवारासावळज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीला लोकार्पण सोहळ्या अगोदरच गळती लागली आहे. स्मार्ट पीएचसीत अद्याप नवीन यंत्रसामुग्री उपलब्ध झाली नाही, आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र याकडे आरोग्य दक्षता समिती, स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
Tags:
Comment List