नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी महसूल विभागाने काम करावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
महसूल विभागाकडून १ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा;मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा; तहसीलदार विक्रम देशमुख
नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी महसूल विभागाने काम करावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
वडगाव मावळ प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने विविध लोककल्याणकरी योजना राबविण्यात येत असून त्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता महसूल विभागाने काम करावे,असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
मावळ तालुक्यात महसूल विभागाकडून १ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या महसूल पंधरवड्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकंडुवार यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.),उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नायब तहसीलदार गणेश तळेकर,बजरंग मेकाले,तालुक्यातील मंडलाधिकारी तलाठी, व कर्मचारी आदीसह उपस्थित होते.
आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा विविध महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकरीता सर्व संबंधित विभागाने काम करावे. शासनाचा महत्वाचा अंग म्हणून महसूल विभाग ओळखला जात असून विभागाच्या वतीने सर्व संबंधित विभागाच्या मदतीने विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येते. नागरिक आणि प्रशासन यांच्यामधला दुवा म्हणून महसूल विभाग करत असल्याने विभागाच्या कामकाजावरुन नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो, ही बाब विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवून काम करावे. महसूल पंधरवड्यात १५ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याकामी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, आपले प्रलंबित विषय मार्गी लावून घ्यावेत. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याबाबत वरिष्ठांना माहिती द्यावी,त्यामध्ये नक्की सुधारणा करण्यात येईल, अशी सूचना त्यांनी केली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना लाभ घ्यावा- डॉ. पुलकुंडवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी अर्ज सादर केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे. पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व पात्र महिलेला या योजनेच्या लाभ देण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणारे दाखले वेळेत उपलब्ध करुन घ्यावे, असे निर्देशही डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.
लोकप्रतिनिधी या नात्याने शासनास सर्वतोपरी मदत करण्यात येईल; आमदार सुनील शेळके
आमदार शेळके म्हणाले, शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता गावपातळी ते जिल्हा पातळीपर्यंत प्रशासन काम करीत असते. प्रशासनाकडून तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या,अडीअडचणी सोडविण्याकरीता नेहमी प्रयत्न केले जातात.लोकप्रतिनिधी या नात्याने शासनास सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आमदार शेळके म्हणाले.
नागरिकांचा महसूल विभागावरील विश्वास अधिक वृद्धींगत करण्याकरीता काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
डॉ. दिवसे म्हणाले, महसूल विभागाच्यावतीने महसुली कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, मोजणी करणे, अपील प्रकरणाची चौकशी करणे आदी कामे वेळेत मार्गी लावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा नागरिकांपर्यंत ठेवण्यासाठी १ ऑगस्ट रोजी 'महसूल दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने महसूल विभागाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येते त्यामुळे महसूल विभाग आणि नागरिक यामधील नाळ आजही घट्ट टिकून आहे. नागरिकांच्या मनात आपले स्थान राखून नागरिकांची सेवा करावी. ग्रामीण भागातील नागरिक महसूल विभागाला नेहमीच सहकार्य करीत असल्याने पुणे जिल्हा प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विश्वास अधिक वृद्धिंगत करण्याकरीता काम करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय छाननी समितीत पात्र ठरलेल्या महिला लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती योजना, विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसेच कुणबी प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र आदी दाखल्याचे वितरण करण्यात आले. नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी सुत्रसंचलन केले जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी सतिश हाके यांनी आभार मानले.
मावळ तालुक्यातील महसूल पंधरवडा आयोजन
दि २ ऑगस्ट- लोणावळा आय.टी.आय येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी माहिती देणे व अर्ज स्वीकारणे दि ३ ऑगस्ट- मावळ पंचायत समिती येथे मुख्यमंत्री तीर्थ योजनेविषयी माहिती देणे व अर्ज स्वीकारणे दि ४ ऑगस्ट- सर्व शासकीय कार्यालयांत स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय अंतर्गत स्वच्छता मोहीम दि ५ ऑगस्ट- तळेगाव येथील हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये कृषी मार्गदर्शन कार्यक्रम दि ६ ऑगस्ट- तळेगाव येथील हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान व मिळणारी भरपाई बाबत मार्गदर्शन दि ७ ऑगस्ट- तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय येथे युवा संवाद कार्यक्रम दि ८ ऑगस्ट- वडगाव, लोणावळा व कामशेत येथील मंडळ अधिकारी कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम दि ९ ऑगस्ट- तहसील कार्यालयात संगणकीय सातबारा प्रणालीबाबत नागरीकांना मार्गदर्शन दि १० ऑगस्ट- तहसील कार्यालयात सैनिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण दि ११ ऑगस्ट- वडगाव नगरपंचायत सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन दि १२ ऑगस्ट- तळेगाव नगरपरिषद कार्यालय येथे दिव्यांगाना विविध योजनांची माहिती देणे दि १३ ऑगस्ट-बावधन येथील प्रांत कार्यालयात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून त्यांचे निराकरण करणे दि १४ ऑगस्ट- तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा वार्तालाप कार्यक्रम दि १५ ऑगस्ट- तहसील कार्यालय येथे महसूल विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान व महसूल पंधरवडा सांगता कार्यक्रम मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पंधरवड्यातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.
Comment List