'... ते फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांचे काम नाही'
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
मुंबई: प्रतिनिधी
एखाद्याला संपवायचे असेल तर मनगटात दम लागतो. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांचे ते काम नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत. मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, आता एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील, अशा शब्दात फडणवीस यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी या आव्हानाचा समाचार घेतला आहे.
महायुती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेली कामे आणि महायुती सरकारच्या काळात झालेली कामे याची जनतेकडून तुलना केली जात आहे. आम्ही प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करतो. लोकांची पसंती आम्हालाच आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातूनच त्यांच्याकडून पातळी सोडून टीका केली जात आहे, असे शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सत्तेवर येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Comment List