मायणी येथील महाविद्यालयास नॅककडून ब दर्जा मानांकन प्राप्त
मायणी : मायणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रेडिटेशन कौन्सिल (नॅक) बेंगलोर या संस्थेकडून बी दर्जाचे (CGPI 2.4) मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शौकतअली सय्यद यांनी दिली. बौद्ध गया विद्यापीठ, बिहारचे प्रो. डॉ. विनय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, आंध्र प्रदेशातील कुर्नूल विद्यापीठाचे कुलसचिव प्रो. डॉ. श्रीनिवासुलू बायनेनी आणि आसाम मधील कॉलेजचे प्राचार्य डॉ. भाबेन चंद्र नियोग यांच्या त्रिसदस्यीय समितीने १५ व १६ जुलै रोजी महाविद्यालयास भेट देऊन सखोल तपासणी केली.
राष्ट्रीय स्तरावरील हे मानांकन प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयातील सर्वच घटकांना कठीण कसोटींना सामोरे जावे लागते. अभ्यासक्रमाचे पैलू, अध्यापन-अध्ययन-मूल्यांकन, संशोधन-नवोपक्रम व विस्तार कार्य, पायाभूत सुविधा व शैक्षणिक संसाधने, विद्यार्थी सहभाग व प्रगती, प्रशासन-नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक विकास व उत्कृष्ट उपक्रम अशा सात मूल्यमापन कसोट्यांचा वापर करून हे मूल्यांकन केले जाते. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख व नॅक समन्वयक डॉ. लक्ष्मण जठार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी गेले वर्षभर घेतलेल्या अथक परिश्रमाचे फलित म्हणून वरील मूल्यांकन प्राप्त झाले. यासाठी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्रदादा गुदगे आणि संस्थापक सचिव सुधाकर कुबेर यांनी जातीने लक्ष घालून मार्गदर्शन केले. ग्रंथालय, वर्गखोल्या व इतर पायाभूत सुविधा यांचे नूतनीकरण करून बहुमोल सहकार्य केले. रंगरंगोटी व इतर सुविधांमुळे आता महाविद्यालयाचे रंगरूप पालटले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. या मूल्यांकन प्रक्रियेत विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी संघ यांचे मोठे योगदान लाभले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
000
Comment List