तुर्कीएमध्ये तब्बल चाळीस लाख कुत्र्यांच्या मानेवर टांगती तलवार
वादग्रस्त कायद्याच्या विरोधात विरोधक आणि प्राणीप्रेमी उतरले रस्त्यावर
अंकारा: वृत्तसंस्था
रस्त्यावर भटकणाऱ्या भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी संमत करण्यात आलेल्या एका कायद्यामुळे या देशातील तब्बल 40 लाख भटक्या कुत्र्यांच्या मानेवर टांगती तलवार उभी राहिली आहे. या कायद्याच्या आधारे भटक्या कुत्र्यांची सरसकट कत्तल केली जाण्याची भीती व्यक्त करून त्याच्या निषेधार्थ विरोधक आणि प्राणीप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.
देशात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली असून या कुत्र्यांच्या झुंडी सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे जिणे मुश्किल झाले आहे. अशा भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी ग्रँड नॅशनल असेंब्लीने नवीन कायदा संमत केला आहे. मात्र, या कायद्याच्या आधारे भटक्या कुत्र्यांची सरसकट कत्तल करण्याचा सरकारचा डाव असल्याचा विरोधकांचा आणि प्राणीप्रेमींचा आरोप आहे. त्यांच्याकडून या कायद्याचा उल्लेख 'कत्तल कायदा' असाच केला जात आहे.
या कायद्यानुसार शहरातील नगरपालिका आणि ग्रामीण भागातील पंचायती यांच्यावर भटक्या कुत्र्यांना पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशा कुत्र्यांची निवासाची व्यवस्था करून त्या ठिकाणी त्यांचे लसीकरण, नसबंदी आणि आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या नागरिकांना कुत्रा दत्तक घेण्याची इच्छा असेल त्यांना त्यांच्या आवडीनुसार कुत्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, गंभीर आजार असलेल्या आणि मानवाच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या कुत्र्यांना ठार करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
कुत्र्यांना ठार करण्याच्या या तरतुदीलाच विरोधक आणि प्राणीप्रेमींचा विरोध आहे. या कायद्यात निरोगी कुत्र्यांचा सांभाळ करण्याची तरतूद असली तरीही ती बासनात गुंडाळून भटक्या कुत्र्यांचा सरसकट संहार केला जाईल, अशी त्यांची धारण आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या रक्षणार्थ विरोधक आणि प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
Comment List